निबंध भाषण

सावित्रीबाई फुले निबंध, माहिती, भाषण मराठी मध्ये (Savitribai Phule)

Information Speech on Savitribai Phule in Marathi

सावित्रीबाई फुले म्हणजे महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची शान आहेत. त्यांच्या कार्याची ओळख पूर्ण भारतभर आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे मागासवर्गीय जातींच्या मुला-मुलींना शिक्षण घेता आले, प्रगती करता आली. ह्या महान व्यक्ती बद्दल आम्ही तुम्हाला काही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. या माहितीचा वापर आपण सावित्रीबाई फुले किंवा त्यांची जयंती, पुण्यतिथी यावेळी होणाऱ्या निबंध, भाषण स्पर्धांमध्ये करू शकता.

येथे दिलेली माहिती ही आर्टिकल स्वरूपात आहे, यात थोडाफार बदल करून तुम्ही यापासून आपला स्वतःचा निबंध किंवा भाषण लिहू शकता.

सावित्रीबाई फुले निबंध (Essay on Savitribai Phule in Marathi)

सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ञ आणि कवियत्री होत्या. त्यांना भारताची पहिली महिला शिक्षिका मानले जाते. पती ज्योतिबा फुले यांच्या सोबत ब्रिटिश राजवटीत भारतीय महिलांना हक्क मिळवून देण्यास त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्याजवळील भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. जाती व लिंगावर आधारित भेदभाव व अन्याय दूर करण्यासाठी त्या आयुष्यभर झगडल्या, महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीतील त्या एक महत्वाची व्यक्ती होत्या. एक समाजसेवी आणि शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले ह्या एक उत्तम मराठी लेखिका सुद्धा होत्या.

सुरुवातीचे आयुष्य

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावी झाला. त्यांचे जन्मस्थान शिरवळ पासून पाच किलोमीटर तर पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मी आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते, सावित्रीबाई त्यांच्या थोरल्या मुलगी होत्या.

वयाच्या १०व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचे लग्न तेरा वर्षांच्या ज्योतिराव फुले (महात्मा ज्योतिबा फुले) यांच्याशी झाले. सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांना स्वतःची मुले नव्हती पण त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतले होते.

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण

सावित्रीबाईंच्या लग्नापर्यंत त्यांचे शिक्षण झाले नव्हते. त्याकाळात त्यांच्या जातीमुळे त्यांना शिक्षणाची परवानगी नव्हती. तसेच ज्योतिराव फुलेंनाही जातीच्या कारणामुळे तात्पुरते शिक्षण थांबवावे लागले होते परंतु पुढे त्यांनी स्कॉटिश मिशनरी शाळेत सातवीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले.

लग्नानंतर ज्योतिरावांनी सावित्रीबाईंचे प्राथमिक शिक्षण घरीच घेतले नंतर पुढील शिक्षण त्यांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भावलकर यांनी दिले. त्यांनी पुढे जाऊन दोन शिक्षक कोर्स चा सुद्धा अभ्यास केला. त्यामध्ये पहिली संस्था अहमदनगर येथीलअमेरिकन मिशनरी सिंथिया फरार ने चालवलेली संस्था होती आणि दुसरी पुण्यातील एक शाळा होती. त्यांच्या या प्रशिक्षणामुळे त्या भारतातील पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या.

करियर

शिक्षिकेचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सावित्रीबाईंनी पुण्यातील महारवाड्यात मुलींना शिकवायला सुरुवात केली. या कामांमध्ये त्यांना क्रांतिकारक स्त्रीवादी सगुणाबाई यांनी मदत केली. यानंतर काही काळानंतर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी भिडे वाडा येथे स्वतःची मुलींची शाळा सुरू केली. भिडे वाडा म्हणजेच तात्यासाहेब भिडे यांचे घर. सावित्रीबाईंच्या या शाळेच्या अभ्यासक्रमात पारंपारिक विषयांसोबत पाशात्य विषयही होते; यात गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा समावेश होता.

१८५१ मध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी मुलींसाठी पुण्यामध्ये तीन शाळा चालू केल्या. या तीन शाळांमध्ये अंदाजे दीडशे विद्यार्थिनी होत्या. अभ्यासक्रमाप्रमाणे या तिन्ही शाळांमध्ये शिकवण्याची पद्धती ही सरकारी शाळांपेक्षा वेगळी होती आणि यांच्या पद्धतीमुळे फुलेंच्या शाळांमध्ये सरकारी शाळांपेक्षा मुलींची उपस्थिती जास्त होती.

सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांना पुराणमतवादी मत असलेल्या समुदायाकडून बराच प्रतिकार झाला. शाळेत जात असताना त्यांच्यावर दगड,शेण फेकले जायचे; तसेच त्यांना शिवीगाळही केला जायचा. फुलेंच्या जातीमुळे त्यांना तीव्र विरोध विरोधाला सामोरे जावे लागले, शुद्र समाज हा हजारो वर्षांपासून शिक्षणापासून वंचित राहिला होता. 1849 पर्यंत सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले हे ज्योतिराव यांच्या वडिलांच्या घरीच राहत होते. 1849 मध्ये जोतीरावांच्या वडिलांनी दोघांनाही घर सोडण्यास सांगितले.

ज्योतिरावांनी घर सोडल्यानंतर ते आपले मित्र उस्मान शेख यांच्या कुटुंबासोबत राहू लागले. तिथेच सावित्रीबाईंची भेट फातिमा बेगम शेख यांच्याशी झाली. फातिमा बेगम शेख या या उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या आणि त्यांना अगोदरच थोडेफार लिहिणे वाचणे येत असे. उस्मान शेख यांनी आपली बहीण फातिमाला सावित्रीबाईं सोबत शिक्षिका प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. पुढे सावित्रीबाईं सोबत त्यांनीसुद्धा पदवी मिळवली आणि त्या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका झाल्या. फातिमा आणि सावित्रीबाई यांनी शेख यांच्या घरी 1849 मध्ये एक शाळादेखील उघडली.

1950 च्या दशकात सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी दोन शैक्षणिक ट्रस्टची स्थापना केली. त्यांना “नेटिव्ह फीमेल स्कूल” आणि “सोसायटी फोर प्रोमोटींग एज्युकेशन ऑफ महार्स, मान्ग्स आणि एक्ससेट्रा” असे नाव देण्यात आले. या ट्रस्ट अंतर्गत पुढे सावित्रीबाई फुले आणि नंतर फातिमा शेख यांच्या नेतृत्वात अनेक शाळा उघडण्यात आल्या. आपले पती ज्योतिबा फुले यांसोबत सावित्रीबाईंनी विविध जातीतील मुलांना शिकवले त्यांनी एकूण 18 शाळा उघडल्या.

मृत्यू

सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत यांनी बुबोनिक प्लेगने त्रस्त रोग्यांवर उपचार करण्यासाठी क्लीनिक सुरू केले. हे क्लिनिक पुण्याच्या बाहेर संक्रमण मुक्त ठिकाणी होते. पुण्यातील मुंढवा येथील महार वस्तीत प्लेगचा संसर्ग झाला होता. तेथील पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या प्लेगने संक्रमित मुलाला दवाखान्यात नेताना सावित्रीबाई ही प्लेगने संक्रमित झाल्या आणि 10 मार्च 1897 रोजी रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

सावित्रीबाई फुले याबद्दल इतर माहिती

  • सावित्रीबाई एक उत्तम लेखिका आणि कवयित्री होत्या. त्यांनी 1854 मध्ये “काव्यफुले” आणि 1892 मध्ये “बावन काशी सुबोध रत्नाकर” असे लेख आणि “गो, गेट एज्युकेशन” नावाची कविताही प्रकाशित केली.
  • त्यांच्या आयुष्याच्या आणि कामाच्या अनुभवामुळे त्या एक स्त्रीवादी म्हणल्या होत्या. त्यांनी स्त्रियांच्या हक्काबद्दल जागृतता पसरवण्यासाठी “महिला सेवा मंडळ” सुद्धा स्थापन केले होते.
  • त्यांनी महिलांसाठी सार्वजनिक जागेची मागणी केली जिथे सर्व जातींच्या महिला एकत्र येऊ शकतील.
  • त्यांनी ‘होम फॉर द प्रिव्हेंशन ऑफ़ इन्फिडिसाईड’ नावाने महिलांचे आश्रयस्थान उघडले.

सावित्रीबाई फुले जयंती भाषण (Speech on Savitribai Phule Jayanti)

“जी माणसे इतिहास घडवतात ती इतिहास कधी विसरू शकत नाहीत, आणि जी माणसं इतिहास विसरतात कधी इतिहास घडवू शकत नाहीत.”

हा देखील एक इतिहास आहे, जेव्हा सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला तो काळ म्हणजे जवळपास पावणे दोनशे वर्षांपूर्वीचा काळ होय. त्या काळच्या समाजाची रचना विषमतेवर आधारित होती, स्त्रियांची परिस्थिती वाईट होती. स्त्री शिक्षणापासून वंचित होती, शिक्षण हे फक्त काही समाजासाठी मर्यादित होतं. अनेक अनिष्ट चालीरीती होत्या, त्यात अस्पृश्यता, सती, केशवपन, हुंडापद्धती. अशाप्रकारे स्त्री भरडली जात होती, स्त्रियांना कोणतेच अधिकार नव्हते.

सती जाणे म्हणजे काय हो? सती जाणे म्हणजे पतीच्या निधनानंतर त्याच्या जळत्या चितेवर पत्नीने आपल्या शरीर झोकून देणे. बघा, कल्पना करा तुमच्या अंगावर काटे येतील; अशी दयनीय अवस्था स्त्रियांची होती. तुम्ही कधी असा वाचले का की कुठला पती पत्नीच्या मृत्युनंतर कधी सती गेला आहे? नाही ना?

स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल, एवढ्यापुरतच स्त्रीच क्षेत्र मर्यादित होतं. म्हणून मला असं वाटतं ” स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदया अमृत नयनी पाणी (2)”. अशी परिस्थिती पाहून त्यावेळीही काहींचे मन हेलावून जात असेल, पण विरोध कोण करणार? समाज कोण घडवणार? बदल कोण आणणार?

अशा परिस्थितीत एक तेजोमय ज्ञानज्योती चा जन्म झाला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी 1831 साली जानेवारी महिन्याच्या तीन तारखेला, या शुभमुहूर्तावर स्त्रियांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी भारतमातेच्या तेजस्वी नारीरत्नाचा जन्म झाला.


(इथून पुढे तुम्ही निबंधात दिलेली माहिती भाषणासाठी ही वापरू शकता. इथे दिलेले भाषण मी स्वतः लिहिले नाही, युट्युब वर एका क्लिपमध्ये एका मुलीने सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमात हे उत्तम भाषण दिले आहे. मी इथे व्हिडीओ लिंक देत आहे बाकीचे भाषण तुम्ही तिथे पहा आणि तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्यांच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा)

References: Savitribai Phule, Speech Video

या लेखामध्ये दिलेली माहिती, निबंध, भाषण जर तुम्हाला आवडले असेल तर खाली आम्हाला चांगली रेटिंग द्या. सावित्रीबाईं बद्दलचे आपले मत आपण कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. धन्यवाद.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 0 Average: 0]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange