निबंध भाषण मराठी

माझा आवडता संत कवयित्री जनाबाई – मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख

संत कवयित्री जनाबाई - मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख

महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. ह्या संतांनी आपल्या शिकवणीतून समाज परिवर्तन घडवून आणले. अशाच या पावन भूमीतील एक संत कवयित्री म्हणजे जनाबाई. शाळेमध्ये मुलांना वेगवेगळ्या थोर व्यक्तिमत्वांबद्दल माहिती, निबंध, भाषण लिहून आणण्यास सांगितले जाते.

या लेखामध्ये आम्ही माझा आवडता संत कवयित्री जनाबाई यांच्याबद्दल माहिती, निबंध, भाषण दिले आहे. हि माहिती तुम्हाला तुमच्या गृहपाठासाठी तसेच संत कवयित्री जनाबाई यांच्या जीवनावर निबंध, भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.


माझा आवडता संत कवयित्री जनाबाई – मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख

मराठी साहित्यात संतकवींनी रचलेल्या ओव्या, भारुडे, अभंग यांनी मराठी साहित्याला माधुर्य प्राप्त झाले आहे. पण हे संत व कवयित्री कुठल्याही शाळेत व महाविद्यालयात जाऊन काव्यशास्त्र शिकलेल्या नव्हत्या, पण स्वतःच्या मनातील भक्तिभावना व्यक्त करणे हाच त्यांच्या निर्मितीमागचा उद्देश होता. त्यापैकीच एक म्हणजे संत जनाबाई. जनाबाईंच्या जन्म कोठे झाला, केव्हा झाला, तिचे आई-वडील कोण याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. कारण ही एक चुकलेली लहान मुलगी नामदेवांच्या वडिलांना जत्रेत सापडली. तिचे कुणीही पालक सापडले नाहीत म्ह्णून त्यांनी तिला आपल्या घरात सांभाळले.

जनाबाई नामदेवांना आपला गुरु मानत असे. म्हणून प्रत्येक अभंगाच्या अखेरीस ती आपला उल्लेख ‘नामयाची दासी जनी’ असा करते. जनाबाईने आपल्या गुरुचे म्हणजे ‘नामदेवांचे चरित्र’ अभंगांतून गायले आहे. नामदेवांचे घर हे भक्तीरसात डुंबलेले होते. नामदेवांचे आई-वडील, त्यांच्या पत्नी, स्वतः नामदेव विठ्ठलभक्तीपर अभंग रचत. या वातावरणात वाढणारी जनाबाई ही परमेश्वरभक्त झाली.

जनाबाईची परमेश्वरावर उत्कट भक्ती होती. ती आपल्या अभांगातून हरिश्चंद्राचे आख्यान सांगते. कृष्णजन्म, बाल-क्रीडा व काला यांचे ती रसभरीत वर्णन करते. जनाबाई आपली भक्तिभावना काव्यात बोलू लागते. थोडेथोडके नाहीत तर जनाबाईचे सुमारे साडेतीनशे अभंग आज उपलब्ध आहेत.

संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरु होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर- संत नामदेव- संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानेश्वरांविषयीही जनाबाईंच्या मनामध्ये प्रचंड भक्ती होती. ‘परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरु’ असे त्यांनी ज्ञानेश्ववरांविषयी म्हटले आहे. कोणतेही काम करताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत.

संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रेत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी जनाबाई देवाशीपण भांडायला कमी करत नसत. ‘वात्सल्य, कोमल ऋतुजा, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात’, असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे त्यांच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात.

तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपानकाका, संत गोरोबा, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदी सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते.

जनाबाईच्या प्रत्येक कामात परमेश्वर मदत करत असे. जनी केर काढते, तर परमेश्वर केर भरतो, जनीचे जाते ओढण्यास मदत करतो. गोवऱ्या लावण्यास मदत करतो. आपल्या अभंगात जनाबाई म्हणतात की, परमेश्वर आंधळ्याची काठी आहे, ती कुठे अडकली आहे? परमेश्वराला ती हरणी म्हणजे व स्वतःला त्याचे पाडस म्हणते. त्याच्या भेटीसाठी तिचे प्राण कंठाशी येतात. ती त्याला धावत येण्यास विनवते. संतमंडळींविषयी जनाबाईस आदर आहे. संतांचा गौरव करताना ती विविध रूपके योजते. साखर व तिची गोडी वेगळी करता येत नाही. त्याप्रमाणे संत व भगवंत यांना वेगळे करता येत नाही, असे ती सांगते. परमेश्वरावरील उत्कट भक्ती, शब्दांचा साधेपणा व मनाचा भोळा भाव जनाबाईच्या रचनेची विशेष आहे. आपल्या गुरूबरोबर इ.स. १३५० मध्ये जनाबाईने समाधी घेतली.


वरील संत जनाबाईंवरील आर्टिकल जर तुम्हाला आवडले असेल चांगली रेटिंग देऊन आम्हाला प्रोत्साहन द्या म्हणजे आम्ही आणखी नवनवीन माहिती तुम्हाला देऊ शकू. आमच्या साईटवर तुम्ही अश्याच काही थोर संतांविषयी माहिती तसेच थोर व्यक्तींबद्दल माहिती पाहू शकता जी माहिती तुम्हाला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये तसेच काहीवेळा सार्वजनिक ठिकाणी भाषण करताना उपयोगी पडेल. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 2 Average: 5]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

1 Comment

Secured By miniOrange