निबंध भाषण

साने गुरुजी माहिती, निबंध, भाषण मराठी मध्ये (Sane Guruji)

साने गुरुजी माहिती, निबंध, भाषण मराठी मध्ये

इथे दिलेल्या माहितीचा वापर आपण साने गुरुजीं विषयी निबंध किंवा भाषण लिहताना करू शकता.

साने गुरुजी माहिती, निबंध, भाषण (Information about, Essay on Sane Guruji)

पांडुरंग सदाशिव साने किंवा साने गुरुजी हे एक मराठी लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र व भारतातील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून ओळखले जाते.

साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी ब्रिटिश भारतातील बॉंबे स्टेटच्या दापोली शहराजवळील पालगड गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिवराव आणि आईचे नाव यशोदाबाई साने होते. (आता हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात येते.) साने गुरुजी आपल्या आई-वडिलांचे तिसरे मुल व दुसरा मुलगा होते. त्यांचे वडील सदाशिराव हे एक महसूल कलेक्टर होते, ज्यांना स्थानीय भाषेत खोत असे संबोधले जात असे. ते ब्रिटिश शासनाच्यावतीने खेड्यातील पिकाचे मूल्यांकन व संकलन करत आणि आपल्या संग्रहातील २५ टक्के हिस्सा त्यांना स्वतःकडे ठेवण्याची मुभा होती.

साने गुरुजींचे बालपण हे तसे चांगले गेले, परंतु नंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली, ज्यामुळे त्यांचे घर सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केले. हा मानसिक त्रास सहन न झाल्याने १९१७ मध्ये साने गुरुजींची आई यशोदाबाई यांचे निधन झाले. वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे साने गुरुजींच्या आईचे निधन झाले तसेच आईच्या मृत्यूच्या वेळी तिची भेट न झाल्याचे दुःख साने गुरुजींना आयुष्यभर राहिले.

साने गुरुजींचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड या गावी झाले. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्यामध्ये मामाकडे पाठवण्यात आले. त्यांना पुण्यात राहणे आवडले नाही म्हणून ते पालगडला परत आले आणि दापोली येथील मिशनरी शाळेत प्रवेश घेतला. साने गुरुजी हे अत्यंत हुशार विद्यार्थी होते, दापोली मध्ये शिक्षण घेताना त्यांनी मराठी व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले.

दापोली येथील शाळेत असताना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली आणि त्यांचे शिक्षण सुरू ठेवणे कठीण झाले. आपल्या मोठ्या भावासारखे त्यांनी कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी नोकरी करण्याचा विचार केला. त्यांच्या एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्यांनी औंध येथील संस्थेत दाखला घेतला. तिथे गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण आणि भोजन दिले जात असे. साने गुरुजींनी औंध संस्थेत आपले शिक्षण सुरू ठेवले परंतु दौंड येथे बुबोनिक प्लेगच्या साथीमुळे सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.

पालगड मध्ये परत आल्यावर साने गुरूजींना त्यांच्या शिक्षणाबद्दलची पालकांच्या चिंतेची जाणीव झाली आणि त्यांनी परत पुण्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुण्यामध्ये नूतन मराठी विद्यालयात प्रवेश घेतला आणि शिक्षण चालू ठेवले. १९१८ मध्ये ते हायस्कूल मॅट्रिक पास झाले. हायस्कूल नंतर त्यांनी पुढे न्यू पूना महाविद्यालयातून मराठी व संस्कृत साहित्यात बी.ए. आणि एम.ए. केले.

साने गुरुजींचे वडील सदाशिवराव हे लोकमान्य टिळकांचे समर्थक होते. परंतु साने गुरुजींच्या जीवनावर वर त्यांच्या आईचा प्रभाव जास्त होता. अध्यापन व्यवसायाची निवड करण्यापूर्वी त्यांनी मराठी आणि संस्कृत या विषयात पदवी संपादन केली आणि तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. साने गुरुजीनी अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. शहरातील श्रीमंत विद्यार्थ्यांना शिकवून पैसे कमावण्यापेक्षा त्यांना ग्रामीण शाळांमध्ये शिकवण्यात जास्त रस होता.

साने गुरुजी हे एक प्रतिभाशाली वक्ते होते, नागरी हक्क आणि न्याय यावर त्यांचे प्रभावी भाषण ऐकून प्रेक्षक मंत्रमुग्ध होत असत. शाळेत असताना त्यांनी “विद्यार्थी” नावाचे एक मासिक प्रकाशित केले, विद्यार्थ्यांमध्ये ते खूप लोकप्रिय झाले. त्यांचा अध्यापनाचा प्रवास फक्त सहा वर्षे चालू राहिला आणि त्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

१९३० मध्ये महात्मा गांधींनी दांडी मार्च सुरू केल्यानंतर साने गुरुजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील होण्यासाठी शाळेतील नोकरीचा राजीनामा दिला. नागरी अवज्ञा चळवळीत सहभाग घेतल्याबद्दल ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना धुळे कारागृहात पंधरा महिने ठेवले. १९३२ मध्ये साने गुरुजी आणि विनोबा भावे एकाच तुरुंगात होते. विनोबा भावे प्रत्येक रविवारी सकाळी भगवद्गीतेवर व्याख्यान देत असत.

१९३० ते १९४७ दरम्यान साने गुरुजींनी वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेतला. यासाठी त्यांना आठ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांना धुळे, त्रिचिनापल्ली, नाशिक, येरवडा आणि जळगाव येथील तुरूंगात एकूण सहा वर्षे सात महिने तुरुंगवास भोगावा लागला. या काळात त्यांनी सात वेगवेगळ्या प्रसंगी उपोषण सुद्धा केले. साने गुरुजी त्रिचन्नापल्ली तुरुंगात दुसऱ्या वेळी असताना त्यांनी तमिळ व बंगाली भाषा शिकली.

ग्रामीण महाराष्ट्रात, विशेतः खानदेशात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस साठी साने गुरुजींनी महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेसच्या फैजपूर सत्राच्या संघटनेत त्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला. तसेच १९३६ च्या बॉम्बे प्रांताच्या निवडणुकीत त्यांनी भाग घेतला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना पंधरा महिने तुरुंगवास झाला. या काळातच मधु लिमये यांसारख्या काँग्रेसच्या समाजवाद्यांची त्यांचे जवळचे नाते जोडले गेले.

1930 च्या उत्तरार्धात साने गुरुजींनी पूर्व खान्देश जिल्ह्यात कामगार वर्गाच्या चळवळीत सहभाग घेतला. वस्त्रोद्योग कामगार व शेतकरी संघटित करण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्याकाळचे कम्युनिस्ट एम. एस. डांगे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते परंतु दुसऱ्या महायुद्धाला पाठिंबा देण्याच्या कम्युनिस्ट पार्टीच्या मतामुळे ते कम्युनिस्ट पासून वेगळे झाले. स्वातंत्र्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले आणि मधु लिमये, एन. जी. गोरे यांसारख्या नेत्यांसोबत त्यांची जवळीक झाली.

अस्पृश्यतेच्या विषयावर जनजागृती करण्यासाठी 1947 मध्ये साने गुरुजी सुमारे चार महिने महाराष्ट्रभर फिरले. अस्पृश्यांसाठी विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी पंढरपूर येथे त्यांनी अकरा दिवस उपोषण केले आणि अखेर विठ्ठल मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांसाठी खुले झाले.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजातील असमानता पाहून सानेगुरुजी निराश झाले. महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला, यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांनी 21 दिवस उपोषणही केले. अशा अनेक कारणांमुळे स्वातंत्र्यानंतरही सानेगुरुजी अस्वस्थ होते. शेवटी 11 जून 1950 रोजी त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली आणि भारताने एक हुशार, कर्ता सेनानी गमावला.

Reference: Sane Guruji

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange