निबंध भाषण मराठी

राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज मराठी निबंध, भाषण, लेख, माहिती

राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज मराठी निबंध, भाषण, लेख, माहिती

आपल्या या भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी, विचारवंतांनी आणि समाजसेवकांनी अथक प्रयत्न केले. काही शूरवीरांनी तर आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा या सर्वांना आणि त्यांच्या कार्याला, बलिदानाला सलाम करूयात. खालील लेखामध्ये आपण राष्ट्रीय एकात्मता याविषयी माहिती पाहणार आहोत. तुम्ही शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंधासाठी, तसेच काही सार्वजनिक ठिकाणी भाषण करताना या माहितीचा उपयोग करू शकता.

राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज – मराठी निबंध, भाषण, लेख, माहिती

‘आम्ही सारे भारतीय आहोत’ अशी प्रतिज्ञा आम्ही विद्यार्थी रोज शाळेमध्ये म्हणत असतो. ही प्रतिज्ञा आमच्या शाळेच्या सर्व पाठ्यपुस्तकातही सुरवातीस छापलेली आहे. पण आज प्रत्यक्ष चित्र काय दिसते? अलीकडे आम्हांला आमच्या इतिहासावर विसर पडला आहे, असे वाटते. ‘आम्ही सारे भारतीय आहोत’ या भावनेतून निर्माण झालेल्या संघभावनेच्या प्रचंड सामर्थ्याच्या जोरावर आपल्याला आपला भारत स्वतंत्र करण्यात यश लाभले. यासाठीच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या नेत्यांनीही आग्रह धरला तो राष्ट्रीय एकात्मतेचा.

त्यावेळी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून आसामपर्यंत सारा भारत स्वातंत्र्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित झाला होता. या एकतेपुढेच बलाढ्य परकीय सत्तेला नमते घ्यावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळातही, जेव्हा जेव्हा आमच्या देशावर परकीय आक्रमण आले, तेव्हा तेव्हा आम्ही सारे भारतीय एकजुटीने शत्रूवर तुटून पडलो. या एकात्मतेच्या भावनेमुळेच नैसर्गिक संकट, सामाजिक आपत्ती व परकीय आक्रमण अशा अरिष्टांवर आपण सहजपणे मात करू शकलो.

आपले राष्ट्र, राष्ट्राचा इतिहास, राष्ट्रीय प्रतीके यांबाबत समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेम आणि निष्ठा निर्माण होणे आवश्यक आहे. विविधतेतील एकता हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे सूत्र आहे. आपल्या राष्ट्राचे संविधान हे आपल्या राष्ट्रीय ऐक्याचा महत्वाचा घटक बनला आहे.

दूरचित्रवाणी, दूरदर्शन, शाप की वरदान, माहिती, निबंध, भाषण

आजचे चित्र मात्र वेगळेच दिसत आहे. परकीय राष्ट्रांच्या चिथावणीने आमच्या काही देशबांधवानी दहशतवाद स्वीकारला आहे. काहीजणांनी राजकीय स्वार्थापोटी लोकांच्या धर्मभावना चेतावल्या आहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशातील आम्ही नागरिक धर्माच्या नावाखाली आमच्याच देशबांधवांच्या जीवावर उठलो आहोत. गांधीजींच्या अहिंसक भारतात आज हिंसेने थैमान मांडले आहे.

अनेक भाषा हे भारताचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असल्याने आम्ही भाषावार प्रांतरचना स्वीकारली. पण आज संकुचित विचारसरणीत अडकलेले आम्ही राज्याराज्यांतील सीमावादावरून एकमेकांचे वैरी झालो आहोत. हे सारे चित्र एवढे भयानक आहे कि आता आमच्या एकसंध भारताची पुन्हा एकदा फाळणी तर होणार नाही ना, अशा भयप्रद शंकेची पाल मनात चुकचुकते.

आज पुन्हा एकदा राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव करून देणारे प्रभावी सामूहिक नेतृत्व उदयाला येणे जरुरीचे आहे. प्रत्येक भारतीयांत राष्ट्रीयत्वाची भावना प्रज्वलित झाली पाहिजे. राष्ट्रीयत्वाचे हे बाळकडू प्रत्येक भारतीयाला मिळाले, तरच आमच्यातील विद्वान तरुण परदेशात चिरवास्तव्य करणार नाहीत. आमच्या देशातील गुपिते परदेशात विकली जाणार नाहीत.

मोबाईल शाप कि वरदान, फायदे, तोटे, दुष्परिणाम मराठी निबंध, भाषण.

देशाला ग्रासणारा भ्रष्टाचाराचा भस्मासुर नष्ट होईल. चोरट्या मार्गाने आणलेल्या परकीय मालाची खरेदी करून स्वतःच्या देशाला बुडवले जाणार नाही. ‘राष्ट्र म्हणजे मी आणि मी म्हणजे राष्ट्र’ अशी एकात्मतेची भावना ज्यायोगे दृढ होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. थोडक्यात, राष्ट्रीय एकात्मता ही आजची खरी निकड आहे.

राष्ट्रीय एकात्मतेसाठी काही उपक्रम –

१. शालेय सहली आखताना शेजारील राज्यांना भेट देणे.
२. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी भारतातील विविध भाषांमधील गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करणे.
३. शालेय उपक्रमांत विविध राज्यांमधील अनेक गोष्टींचा समावेश करणे. उदा. इतिहास, भूगोल, सण, उत्सव
4. शाळेमध्ये आंतरभारती केंद्राची स्थापना करणे. त्या केंद्राद्वारे विविध भाषांच्या अभ्यासाला चालना देणे.
५. विविध प्रांतांमधील, शाळांमधील विद्यार्थ्यांशी पत्रमैत्री, अनुभवांची देवाणघेवाण करणे.
६. देवाण घेवाण कार्यक्रमांतर्गत निवासी शिबिराचे आयोजन करणे.

वरील आर्टिकल जर तुम्हाला आवडले असेल तर चांगली रेटिंग देऊन आम्हाला प्रोत्साहित करा म्हणजे आणखी माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकू. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 3 Average: 4.3]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange