सूत्र संचालन

निरोप समारंभ सूत्रसंचालन कसे करावे?- Nirop Samarambh in Marathi

निरोप समारंभ सूत्रसंचालन

या लेखामध्ये आपण निरोप समारंभ सूत्रसंचालन कसे करावे हे पाहणार आहोत. इथे आपण निरोप संभारंभ सूत्रसंचालनाचा एक बेसिक फॉरमॅट पाहणार आहोत जो तुम्ही विविध कार्यक्रमात वापरू शकता जसे की शिक्षक, मुख्याध्यापक यांची सेवानिवृत्ती, दहावी बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ इत्यादी. या लेखामध्ये आपण शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्यासाठी च्या निरोप समारंभाचे सूत्रसंचालन पाहू.

शिक्षक सेवानिवृत्ती निरोप समारंभ सूत्रसंचालन

निरोपाचा क्षण नाही
शुभेच्छांचा सण आहे
पाऊल बाहेर पडताना
रेंगाळणारं मन आहे..

मी __________ सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो

सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही,
नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाही.

कार्यक्रमाचा परिचय

आज आपण येथे माननीय श्री. पाटील सर यांच्या निरोप समारंभासाठी जमलो आहोत. निरोप..निरोप.. म्हणजे नक्की काय? आपले सर आपला निरोप घेणार म्हणजे त्यांच्यासोबत आपलं नाते तुटले की काय? आपल्यातील हे बंध एवढे नाजुक आहेत का? नाही…. सरांसोबत आपला रोजचा सहवास तुटेल व त्यांच्या सोबत जोडलेले नाते हे कधीच तुटू शकणार नाही. हे मनाचे मनाशी जोडले नाते आहे ते असे तुटू शकत नाही.

सरांच्या निरोप समारंभाचे सूत्रसंचालन करण्याचा सन्मान मला दिलात त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. माझ्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. पाटील सरांनी गेले 35 वर्षे सरस्वती मातेची सेवा केली, यांच्या हाताखालून किती नेते, राजनेते, व्यवसायिक आणि माझ्यासारखे शिक्षक शिकून गेले. वेळ कसा जातो समजत नाही. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की पाटील सर हे माझे पहिले गुरू होते, त्यांच्यासारखा गुरु लाभणे म्हणजे नशीबच म्हणावे लागेल.

पाटील सर यांनी सर्विसच्या बाहेरही खूप काम केले आहे. गरिबातील गरीब मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. त्यांनी सुरू केलेले खूप सारे उपक्रम आता विविध शाळांमध्ये राबवले जातात.अशा या यशस्वी, मुक्त मनाच्या, उदार, ज्ञानी, विनम्र, धैर्यवान, जबाबदार आणि अत्यंत आदरणीय शिक्षकाच्या निरोप समारंभाला आपण येथे जमलो आहोत.

पाहुण्यांचे स्वागत

मी या कार्यक्रमात माननीय राधिका ताई यांचे स्वागत करतो. राधिका ताई, हे नाव आपल्याला काही नवे नाही; त्यांना आपण सर्व ओळखतोच. त्यांनी आपल्या जिल्ह्याचे नाव पंचक्रोशीत पसरवले आहे. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर त्यांच्या कामाचे कौतुक पूर्ण भारतात होते. आज त्यांची इथली उपस्थिती म्हणजे आपल्यासाठी हा एक गौरवपूर्ण क्षण आहे. माननीय राधिका ताई आणि माननीय पाटील सर यांनी एकत्र खूप सारे उपक्रम राबवले, पाटील सर त्यांना आपल्या गुरू मानतात.

मी माननीय राधिका ताईंना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे.

तसेच मी माननीय पगार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून स्थान स्वीकारावे.

मागच्या काही वर्षात आपल्या गावाचा कायापालट करणारे, एक तरूण आणि धडाडीचे नेतृत्व म्हणजे माननीय सरपंच साहेब यांना मी विनंती करतो की आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आपण स्थान स्वीकारावे.

दिपप्रज्वलन/ सरस्वती पूजन

जसा माननीय पाटील सरांनी गेली 35 वर्ष आपल्या ज्ञानाने निरक्षरतेचा अंधार परतवून लावला तसेच काहीसे या दिपमाला आपल्याला सांगतात. तसेच, सरस्वती मातेचे आपल्यावर आशीर्वाद सदैव राहावेत मी अशी प्रार्थना करतो.

मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मार्गदर्शक आणि प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यासाठी व्यासपीठावर यावे. सर्वांनी माननीयांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे.

माननीयांचा सत्कार

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ______ यांचा श्री._____ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो….

(असेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि प्रमुख पाहुणे यांचाही सत्कार करून घ्या)

अध्यक्षांचे भाषण
मी आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री_______ यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपले विचार प्रकट करावे.

मी प्रेक्षकांना विनंती करतो की टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे… (अध्यक्षांचे भाषण संपल्यानंतर) मी अध्यक्ष महाशय यांना विनंती करतो की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे.

मी आता आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय श्री ________ यांना विनंती करतो की त्यांनी आपणास मार्गदर्शन करावे.

माननीय यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झाले पाहिजे. (मार्गदर्शकांचे भाषण संपल्यानंतर) मी माननीय श्री._______ यांना विनंती करतो की आपण आपले स्थान ग्रहण करावे…

विद्यार्थ्यांचे मनोगत

विद्यार्थी म्हणजे शिक्षकाच्या जीवनातले अभिन्न अंग. कुठलाही शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या शिवाय अपूर्ण असतो, तसेच विद्यार्थी देखील शिक्षकां शिवाय अपूर्ण असतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकांना दुसरे मातापिता संबोधले आणि हे उगाचच नाही. मुलांना ज्ञान देण्याचे आणि त्यांच्यावर संस्कार करण्याचे, शिस्त लावण्याचे काम हे शिक्षकच करत असतात.

त्यामध्ये आपले पाटील सर तर विद्यार्थ्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांचा प्रेमळ स्वभाव सर्व विद्यार्थ्यांना खूप आवडतो, त्यामुळे त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप वेगळेच नाते आहे. त्यांचे नाते एवढे प्रेमळ आणि निरागस आहे की कधीकधी आमच्यासारख्या नवीन शिक्षकांना याची ईर्षा होते. आमच्यासाठी पाटील सरांकडून शिकण्यासारखे अजूनही खूप काही आहे. या ज्ञानसागरातील दोन थेंब आमच्या नशिबी यावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपले मनोगत व्यक्त करावे…… (विद्यार्थ्यांचे मनोगत पूर्ण झाल्यानंतर)… कोण म्हणतो की आजच्या जमान्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये काही नाते राहिले नाही. आज समीरने मांडलेल्या मनोगतातून दिसून येते की गुरू-शिष्याचे नाते किती अनमोल असते. ज्या भावना समीरने प्रकट केल्या त्या आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आहेत. पाटील सरांना निरोप देण्याच्या विचाराने मन अगदी दाटून येते हे मात्र खरे…

(त्याच प्रमाणे आपण विविध कार्यक्रम जसे की शिक्षकांचे मनोगत, नृत्य, गायन इत्यादी आयोजित केले असेल तर त्यांचा परिचय द्यावा. सूत्रसंचालन चा शेवटचा भाग म्हणजे धन्यवाद भाषण. शक्यतो धन्यवाद भाषण हे शाळेतील किंवा कॉलेजमधील वरिष्ठ शिक्षक शिक्षिका देतात.)

मी श्रीमती मोरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे धन्यवाद भाषण देण्याकरता व्यासपीठावर यावे.

मी आता जाहीर करतो की माननीय श्री. पाटील सरांचा निरोप समारंभ येथे समाप्त झाला. पण हा फक्त कार्यक्रमा चा शेवट आहे, आपला आणि पाटील सरांच्या बंधाचा नाही.

मला या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी दिल्याबद्दल मी शाळेचे आणि अधिकाऱ्यांचे परत एकदा धन्यवाद मानतो..

निरोप समारंभ सूत्रसंचालनासाठी काही टिप्स

शक्यतो निरोप समारंभा मध्ये खूप साऱ्या कविता, चारोळ्या, शेरोशायरी वापरल्या जातात. त्याच ठरलेल्या 4 कविता, चारोळ्या आणि शेरोशायरी सूत्रसंचालनामध्ये वापरल्या जातात. मी तुम्हाला असे सुचवतो की तुम्ही स्वतःचे नवीन काहीतरी लिहावे. कविता, चारोळ्या सूत्रसंचालन वापरणे अनिवार्य नाही, जर तुम्ही योग्य ठिकाणी योग्य प्रकारे वापरू शकलात तरच वापरा.

कुठल्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे हे आम्ही एका वेगळ्या लेखामध्ये लिहिले आहे ते तुम्ही वाचू शकता. जर तुम्हाला या लेखांमधून काही मदत मिळाली असेल तर खाली तुम्ही या लेखाला चांगली रेटिंग देऊ शकता.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange