निबंध भाषण

निरोप समारंभ भाषण, मनोगत मराठी मध्ये – शिक्षक सेवानिवृत्ती

निरोप समारंभ भाषण, मनोगत मराठी मध्ये - शिक्षक सेवानिवृत्ती

ह्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला शिक्षक सेवानिवृत्ती निरोप समारंभासाठी एक भाषण आणि एक मनोगत देणार आहोत. पहिल्या भागामध्ये तुम्हाला एका विद्यार्थ्याने शिक्षकांसाठी व्यक्त केलेले मनोगत सापडेल आणि दुसर्‍या भागामध्ये एका शिक्षकाने सेवानिवृत्त होणाऱ्या दुसऱ्या शिक्षकासाठी होणाऱ्या निरोप समारंभामध्ये दिलेले भाषण मिळेल.

इथे दिलेले भाषण किंवा मनोगत जसेच्या तसे कॉपी करण्यापेक्षा तुम्ही ते समजून घ्या, त्यातल्या भावना समजून घ्या आणि त्यावरून तुमचे स्वतःचे असे एक भावनिक भाषण किंवा मनोगत लिहा. ज्या शिक्षकांबद्दल तुम्ही बोलणार आहात त्या सोबतचे तुमचे अनुभव वेगळे असतील, ते अनुभव आपल्या भाषणात किंवा मनोगतामध्ये मांडणे खूप महत्वाचे आहे. तेव्हा तुमचं भाषण हे मनाला स्पर्श करणारे बनेल. नाहीतर तुम्हाला नेहमी नेहमी वापरले जाणारे टिपिकल निरोप समारंभाचे भाषण वापरावे लागेल, आणि मला असे वाटते की ते भाषण ना त्या शिक्षकांना ना तुमच्या प्रेक्षकांना आवडेल, तर मग अशा मनोगताचा भाषणाचा उपयोग काय?

शिक्षक सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण

नमस्कार मी………., आजच्या कार्यक्रमाच्‍या उत्सव मूर्ती माननीय श्री पाटील सर, आजच्या कार्यक्रमाचे सन्मानीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजनवर्ग आणि उत्तमोत्तम शिक्षक लाभलेल्या आणि आणि स्वतःचे जीवन घडवणाऱ्या शिक्षकांसाठी कृतज्ञतेच्या भावनेने गौरव करण्यासाठी निरोप समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार.

प्रथमतः समाज घडवणाऱ्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, साने गुरुजी, महात्मा फुले, अब्दुल कलाम आझाद आणि ज्ञात अज्ञात अशा सर्व शिक्षकांना, शिल्पकारांना प्रणाम करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. आज पाटील सर निवृत्त होत आहेत म्हणून माझ्या मनात विचार आला आज त्यांना गुरुदक्षिणा द्यायची? मनात पहिला विचार आला की पैशांचे पाकीट देऊया. अरे पण ज्यांनी शिकवले कुणाचे फुकटचे घ्यायचे नाही आणि कुणाला फुकटचे द्यायची नाही, याने लाचारी निर्माण होते आणि ती माणसाला संपवते आणि मग हे रुजवणाऱ्या सरांना मी पैसे देऊ?

त्याक्षणी मनात दुसरा विचार आला, सरांना मग एक भेटवस्तू देऊयात. पण ज्या सरांनी मूल्य संस्कारांची, ज्ञानाची अक्षय भेट देऊन माझे जीवन एक सुंदर वास्तु बनवली त्यांना मी भेटवस्तू कोणती आणि कशी देणार? शेवटी मनात एक विचार आला, ज्या सरांनी मला असंख्य शब्दांचे भंडार देऊन वाचायला, लिहायला, बोलायला शिकवले; त्यांना त्यांनीच दिलेल्या शब्दांच्या कोषातून काही प्रेमाचे, आदराचे आणि कृतज्ञतेचे शब्द अर्पण करूया. आमच्या पाटील सरांना ही भेटवस्तू नक्कीच आवडेल असा माझा विश्वास आहे म्हणून हा सारा शब्दप्रपंच.

आज सरांचा निवृत्ती सोहळा आहे. हा फक्त निवृत्ती सोहळा नसून, विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप देत ज्ञान रुजवणूक करणाऱ्या, आयुष्यभर इतरांना मार्गदर्शन करणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या सरांचा आणि त्यांच्या प्रामाणिक कार्याचा गौरव आहे. त्यांच्या भावपूर्ण सेवेचा गौरव आहे. शिक्षक अन् विद्यार्थी या अतूट बंधनाचा गौरव आहे.

इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझी एक विनंती आहे की त्यांनी स्वतःचे बालपण आठवावे. शाळेतील पहिला दिवस आठवावा. मी, तुम्ही, आपण सर्वांनी रडणाऱ्या चिमुकल्यांचे अश्रु पुसताना अनेक शिक्षकांना पाहिले आहे, अनुभवले आहे. मीदेखील माझ्या बालपणात डोकावले तर मला पाटील सर आठवतात. मी जेव्हा बालवाडी तून पहिलीत गेलो तेव्हा मला या जगाची काहीच माहिती नव्हती, त्यावेळी सरांनी मला अनेक नवनवीन गोष्टी शिकवल्या, सर्व वस्तूंची माहिती दिली, माझी सर्व जबाबदारी त्यांनी घेतली. मी शाळेत सुद्धा त्यांच्या सोबत जात असे, ते आमच्या शेजारीच राहत असत.

माझे विचार, मते घडण्यामागे त्यांचा खूप मोठा वाटा आहे, आई वडिलांप्रमाणे मला घडवण्यामध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे. एखादी चुकीची गोष्ट केली की त्यासाठी शाळेला आणि शिक्षकांना जबाबदार धरलं जातं, त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार खूप महत्त्वाचे ठरतात. सरांनी केवळ ज्ञान देऊन माझे जीवन समृद्ध केले नाही ही तर आयुष्य कसे जगावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले आणि अजूनही करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा शिक्षक असतो जो विद्यार्थ्यांच्या मनात कायम आदराचे स्थान निर्माण करतो. माझ्या मनात सरांबद्दल आदरयुक्त प्रेम आणि आदरयुक्त भीती ही आहे. ते नेहमीच माझे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवतात त्यांच्याशी बोलल्यावर माझ्या मनात खूप सकारात्मक उर्जा येते.

ते माझे पालक बनून मायेने काळजी घेतात; माझ्या यशात आनंदाश्रू ढाळताना आणि माझ्या अपयशात दुःखी होताना पाहिले आहे, अनुभवले आहे. लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारा परीस मी कधी पाहिला नाही, कदाचित तो काल्पनिक ही असेल. पण चालता-बोलता परीस मी पाहिला आहे, अनुभवला आहे. होय, अनेक लोखंडी रुपी पालकांचे सोनेरी नागरिक बनवणारे पाटील सर आहेत. “अशक्य” हा शब्द ज्यांच्या डिक्शनरी मध्ये नाही अशा पाटील सरांचा मला सदैव अभिमान आहे. न भूतो न भविष्यती असे पाटील सर पुन्हा होणे नाही.

आज समाजातील काही मूठभर लोकांचे विचार पाहून त्यांची कीव येते. दोन-चार अपवादात्मक, अप्रामाणिक मंडळीमुळे अखिल शिक्षक वर्गाला बदनाम केले जाते. एक शिक्षक हा प्रामाणिक असतो आणि जो प्रामाणिक नसतो तो शिक्षकच नसतो. मग शिक्षक नसलेल्याकडे पाहून शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात काय अर्थ आहे? इंटरनेट जगतातील 2G ची जागा 4G ने घेतली, 4G ची जागा कदाचित 5G घेईल पण आमच्या सरांची जागा कोणीही नाही घेऊ शकणार. हे कालही सत्य होते, आजही आहे आणि उद्याही असेल. समाजातील वातावरण दूषित होताना दिसतंय, याचे कारण काय? आज-काल शाळेतील शिक्षकांपेक्षा टीव्ही, मोबाईल, इंटरनेट यांसारख्या निर्जीव शिक्षकांचा प्रसार होत आहे. यात संस्काराचा स्पर्श नसतो, मग कसा होणार नैतिक, सामाजिक विकास? कशी साधणार सामाजिक प्रगती? कसे होतील मूल्यसंस्कार? कसा होईल देश महासत्ता? याचा नक्कीच प्रत्येकाने विचार केला पाहिजे.

एक इंजिनियर मशीन घडवतो, एक डॉक्टर रोग्याला निरोगी बनतो, एक गवंडी एक इमारत उभारतो पण एक माणूस घडवण्याची कला फक्त आणि फक्त शिक्षकाकडे असते. ज्यांनी मला पाहिलं, ओळखलं, अभ्यासलं आणि घडवलं अशा माझ्या ईश्वररुपी पाटील सरांना साष्टांग प्रणाम करतो त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो आणि माझ्या मनोगताला पूर्णविराम देतो. धन्यवाद. जय हिंद… जय महाराष्ट्र.

सूचना: हे सेवानिवृत्तीचे निरोप समारंभातील भाषण (मनोगत) मी लिहिलेले नाही. या विषयाबद्दल रिसर्च करताना मला एक छान युट्युब व्हिडीओ मिळाला. तो व्हिडिओ ऐकल्यावर मला वाटलं की शिक्षक सेवानिवृत्ती निरोप समारंभासाठी यापेक्षा चांगलं मनोगत / भाषण मी लिहू नाही शकणार. म्हणूनच मी त्या व्हिडिओचे टेक्स्ट मध्ये रूपांतर करून इथे शेअर करत आहे. तुम्ही हा व्हिडिओ इथे पाहू शकता.

शिक्षक सेवानिवृत्ती निरोप समारंभ  मनोगत

नमस्कार मी………., आजच्या कार्यक्रमाच्‍या उत्सव मूर्ती माननीय श्रीमती जगदाळे मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे सन्मानीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजनवर्ग आणि इथे जमलेले विद्यार्थी, सर्वांना माझा नमस्कार.

आज आपण येथे इथे माननीय जगदाळे मॅडम यांच्या निरोप समारंभ निमित्त जमलो आहोत. मी जगदाळे मॅडम यांना गेल्या तीस वर्षांपासून ओळखतो. आमचे मूळ गाव एकाच तालुक्यामध्ये आहे, आमचे महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा एकाच ठिकाणी झाली. मॅडम माझ्या 5 वर्ष सीनियर आहेत, माझ्या अगोदर त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. ज्यावेळी मी त्यांच्याकडे शैक्षणिक मार्गदर्शनासाठी विचारपूस करण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी मला करिअर साठी खूप सारे ऑप्शन सुचवले. मग मी त्यांना विचारले, तुम्ही शिक्षिका बनण्याचे का ठरवले? त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्या उत्तराने मला सुद्धा शिक्षण क्षेत्रात येण्यास प्रवृत्त केले.

मॅडम म्हणाल्या, की आपण आयुष्यभर फक्त घेत राहतो. आई-वडिलांकडून, परिवाराकडून,समाजाकडून, देशाकडून; आपण फक्त घेत राहतो. पण सगळे जर घेत राहिले तर मग देणार कोण. आपल्यासारख्या गावच्या ठिकाणी गरिबीचा वास आहे, गरीबी घालवण्यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे शिक्षण. आणि जर आपणच या शिक्षण प्रणालीमध्ये आलो नाही तर आपल्या गावाकडची गरीबी जाणार कशी. मॅडमची त्या वयातील ही विचारशैली पाहून मी अजूनही थक्क होतो. मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या त्या शब्दांनी माझे आयुष्य घडवले. नाहीतर मी हि कुठेतरी प्रायव्हेट कंपनी मध्ये आयुष्यभर काम करत बसलो असतो आणि मला शिक्षक म्हणून आता जो आनंद मिळतो त्याला मी मुकलो असतो. म्हणून आज सर्वांसमोर मी मनापासून तुमचे धन्यवाद मानतो. कदाचित मला शब्द मिळत नाहीयेत की मी तुमचा किती कृतज्ञ आहे, पण कृपया तुम्ही माझी भावना समजून घ्या.

मॅडमचे लक्ष नेहमी खूप मोठे होते. त्या फक्त एक शिक्षिका बनून राहिल्या नाहीत तर त्यांनी या शिक्षण प्रणालीमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, आणि तो आणला सुद्धा. मॅडम ने सुरू केलेले खुप सारे उपक्रम आज महाराष्ट्रभरच्या शाळांमध्ये राबवले जातात. जगदाळे मॅडमचे कौतुक फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये सुद्धा होते. त्यांना विविध शैक्षणिक सेमिनारमध्ये बोलवले जाते; मोठे शैक्षणिक अधिकारी, राजनेते यांचे भाषण आवर्जून ऐकतात. आपल्या साऱ्यांचा नशीबच की अशी एक महान व्यक्ती आपल्या सोबत आहे.

मी इथे असं बोललो की, मॅडम आपल्या सोबत आहेत. हो, आज आपण त्यांना निरोप देत आहोत पण याचा अर्थ असा नाहीत की त्या नंतर आपल्या सोबत नसतील. कदाचित त्यांना आपण रोज नाही पाहू शकणार पण त्यांनी केलेलं काम, त्यांनी जोडलेली नाती ही नेहमी आपल्या सोबत राहतील. मी आशा करतो की भावी आयुष्यात ही मॅडमने असेच त्यांचे गौरवपूर्ण काम चालू ठेवावे. आणि मला नक्कीच माहीत आहे की सेवानिवृत्ती झाली म्हणून त्या काही गप्प बसणार नाहीत. काही दिवसांपूर्वीच आमचे बोलणे झाले, त्यात मॅडमने आपले निवृत्तीनंतरच्या योजना सांगितल्या. यावर एक गोष्ट मात्र मी बोलू शकतो, मोठी माणसं ही मोठीच असतात त्यांना वेळ, काळ, वय, अडचणी आडवु शकत नाहीत आणि ह्या अशाच आपल्या मॅडम निरंतर शिक्षण प्रसारासाठी आणि त्यातील बदलासाठी झगडत राहणार आहेत.

मी त्यांच्या आरोग्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. मॅडम तुम्ही माझ्या प्रेरणास्थान आहात आणि माझ्यासारख्याच शेकडो शिक्षक वर्गाच्या आणि हजारो विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक आहात. परत एकदा तुम्हाला सलाम करून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.

Note: जर हा लेख तुम्हाला आवडला असेल किंवा याची थोडीफार मदत झाली असेल तर या लेखाला खाली चांगली रेटिंग द्या. तुम्ही तुमचा अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 1 Average: 1]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange