मराठी निबंध भाषण

मी केलेली सहल, आमची सहल मराठी निबंध, भाषण, लेख

मी-केलेली-सहल-आमची-सहल-मराठी-निबंध-भाषण-लेख

लहान मुलांना शालेय जीवनात अनेक गोष्टींची उत्सुकता असते आणि त्यापैकी एक म्हणजे शालेय सहल. सहलींमधून मुलांना विविध स्थळांना भेट देता येते. तेथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून घेता येते. तसेच रोजच्या अभ्यासातून बाहेर पडून एक वेगळा अनुभव घेणे हि मुलांसाठी गरजेचे असते. मुलांना शाळेमध्ये विविध विषयांवर निबंध आणि भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते आणि मी केलेली सहल, आमची सहल हा विषय त्यापैकीच एक. ह्या लेखामध्ये आम्ही मी केलेली सहल, आमची सहल या विषयावर निबंध, भाषण दिले आहे. हा लेख तुम्हाला मी केलेली सहल, आमची सहल मराठी निबंध लिहण्यास नक्की मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

मी केलेली सहल, आमची सहल मराठी निबंध, भाषण, लेख

नाताळची सुट्टी संपून नुकतेच ८ ते १० दिवस झाले होते. वर्गामध्ये शिपाई काका नोटीस घेऊन आले. वर्ग  शिक्षकांनी आम्हाला ही नोटीस वाचून दाखवायला सुरुवात केली सहलीची नोटीस आहे असे कळल्याबरोबर आम्ही सर्व मैत्रिणींनी ‘येस्स’ असे जोरात ओरडले.त्यानंतर पूर्ण नोटीस ऐकली आणि आमची किलबिल,  चर्चा चालू झाली. आमची सहल ही ३ दिवसांसाठी रेल्वेने हैद्राबादला जाणार होती. आम्ही दुसऱ्याच दिवशी सर्व मैत्रिणींनी सहलीची पूर्ण फी वर्गशिक्षकांकडे जमा केली.

१५ जानेवारी रोजी आम्ही सर्वजण सांगितल्याप्रमाणे सकाळी ६ वाजता शाळेमध्ये जमलो. सकाळी आठ वाजता पुणे रेल्वे स्टेशन येथून रेल्वे निघणार होती. रेल्वेचा प्रवास सुरु झाला. त्यावेळी पहिल्यांदाच मी रेल्वेमध्ये बसले होते. आम्ही सर्व मैत्रिणी रेल्वेमध्ये एका ठिकाणी बसलो. गाण्यांच्या भेंड्या खेळल्या, जोक्स एकमेकांना सांगितले यामध्ये वेळ कसा गेला कळलेच नाही.

त्यानंतर रात्री एकत्र घोळका करून एकमेकांना भुतांच्या गोष्टी सांगितल्या. खूप मज्जा केली आम्ही सर्वांनी. थोड्याच वेळात शिक्षकांनी आम्हाला आवरून सर्व सामान घेऊन तयार राहायला सांगितले कारण पुढील स्टेशनवर आम्हाला उतरायचे होते. खिडकीतून बाहेर पाहिले तर सगळीकडेच उत्तुंग इमारती पाहायला मिळत होत्या. पहाटे आम्ही हैद्राबादमध्ये पोहोचलो.

हैद्राबाद स्टेशनवर उतरल्यावर खाजगी बसने आम्ही एका हॉटेलवर उतरलो. जे हॉटेल आमच्या शाळेने आमच्यासाठी ३ दिवसांसाठी बुक केले होते. तेथे सर्व सामान ठेऊन आम्ही सकाळी नाश्ता करून ‘रामोजी फिल्म सिटी’ पाहण्यासाठी गेलो. आम्हाला सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती कि ५००० एकरमध्ये असलेली ही फिल्म सिटी कशी असेल.

रामोजी फिल्म सिटीच्या मेन गेट जवळूनच आत जाण्यासाठी फिल्म सिटीच्या खाजगी बसेस होत्या. तेथे पोहोचल्यानंतर सकाळी रामोजी फिल्म सिटी सुरु होताना तेथील कलाकारांच्यावतीने वेलकम केले जाते. खूप सुंदर असे डान्स करून हे कलाकार आपले वेलकम करतात आणि फिल्म सिटीचा  दरवाजा उघडतो. चित्रपटांमध्ये काढले जाणारे वेगवेगळे आवाज कसे काढले जातात हे तेथे पाहायला मिळाले.

टीव्हीवर आपण जे वेगवेगळे महल पाहतो ते प्रत्यक्षात पाहायला मिळाले. चित्रपटातील हॉस्पिटल तसेच अँब्युलन्सही आम्हाला तेथे पाहायला मिळाल्या. वेगवेगळ्या चित्रपटातील वापरले गेलेले बंगलो, महल हे आम्हाला तेथील गाईडने दाखविले. चित्रपटांमधले गार्डनही आम्हाला तेथे पाहायला मिळाले. रामोजी फिल्म सिटीमध्ये सर्व प्रकारच्या चित्रपटांचे चित्रीकरण चालते.

तेथे चालू असलेल्या एका तेलगू चित्रपटाचे चित्रीकरण आम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर फिल्म सिटीमध्ये असलेल्या उंचच उंच अशा पाळण्यांमध्ये आम्ही बसलो. दुपारी आम्ही रामोजी फिल्म सिटीमध्ये असलेल्या ‘दिल से’ हॉटेलमध्ये आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि त्यानंतर आम्ही मुक्काम असलेल्या हॉटेलवर परतलो. रात्री रूममध्ये खूप मस्ती आणि गप्पागोष्टींमध्ये वेळ कसा गेला आणि झोप कधी लागली हे कळलेच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही नाश्ता करून कुतुबशाहाची राजधानी असलेला गोवळकोंडा किल्ला पाहायला गेलो. तिथे निजामासाठी असलेल्या शाही सुविधा आणि त्यांच्या खाणाखुणा पाहून तेव्हाच्या कारागिरांचे फारच कौतुक वाटले. किल्ल्याच्या पायथ्याजवळ असणाऱ्या एका खांबाजवळून बोललेला आवाज हा गुप्तपणे गडावर राजापर्यंत पोहचत असे.

तेव्हाच्या राणींसाठी असणारी मेकअपची खोली पाहायला मिळाली. पिण्याच्या पाण्याचे छोटे कुंड तेथे पाहायला मिळाले. तसेच तेथील गाईडने किल्ल्याची संपूर्ण माहिती आम्हाला दिली. तेथून आम्ही चारमिनार पाहायला गेलो.

नेहमी चित्रात पाहिलेला चारमिनार प्रत्यक्षात पाहणार हे ऐकून आम्ही आनंदाने उद्या मारू लागलो. त्यानंतर ४ च्या सुमारास आम्ही ‘बिर्ला मंदिर’ पाहण्यासाठी गेलो. तेथे पोहोचताच महात्मा गांधीजींची आठवण झाली. ‘स्वच्छता’ हे गांधीजींचे ब्रीद आम्हाला तिथे पाहायला मिळाले. बिर्ला मंदिर हे पांढऱ्या शुभ्र अशा संगमरवरी दगडामध्ये बांधलेले आहे.

मंदिर भरपूर उंचावर असल्यामुळे तेथून संपूर्ण हैद्राबाद पाहायला मिळते. निरनिराळी दुकाने विद्युत रोषणाईने सजवलेली होती. त्यांचे चमचमने एखाद्या नववधूने लखलखता हार घालून सजल्याप्रमाणे भासत होते. तेथे आम्ही थोडीफार खरेदी केली आणि त्यानंतर हॉटेलवर गेलो.

तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरून अतिशय भव्य आणि सुप्रसिद्ध असे सालारजंग म्युझिअम  पाहण्यासाठी गेलो. तेथे पोहोचल्यानंतर आमच्या शिक्षकांनी आम्हाला सर्वांना ओळींमध्ये उभे केले आणि अगदी शांततेत हे म्युझिअम पाहण्यासाठी संगितले. आम्हाला संपूर्ण म्युझिअम दाखविले. अतिशय सुंदर असे हे ४ मजली म्युझिअम पाहून खूपच आनंद झाला.

तेथे अनेक महान शूरवीर अशा लोकांचे हुबेहूब पुतळे पाहायला मिळाले. जणू काही ते आपल्याकडेच पाहत आहेत असे वाटत होते. तिथे निरनिराळ्या खोल्यांमध्ये निरनिराळ्या वस्तू, पुराणी शिल्पे आणि पूर्वीच्या राजांच्या महालातील नक्षीदार काम केलेल्या वस्तू पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. पूर्वीची हत्यारे, चिलखत, जिरेटोप तसेच पोर्सेलीनच्या डिशेस, निरनिराळे फोटोग्राफ्स पाहून नवीन काहीतरी पाहायला मिळाल्याचा आनंद, समाधान वाटले.

पूर्वीच्या राजा महाराजांनी निजामाला भेटीदाखल दिलेल्या वस्तू कपाटात जतन करून ठेवल्या होत्या. भरतकाम, नक्षीकाम, विणकाम या कला त्या काळात किती सुबक होत्या हे समजले. सालारजंग म्युझिअम पाहून झाल्यानंतर आम्ही स्नो वर्ल्डमध्ये गेलो. स्नो वर्ल्ड मध्ये ५ अंश तापमान होते. २ तास आम्ही तेथे बर्फामध्ये खेळलो. स्केटिंग केले. जसे काही काश्मीरला असल्याचा मनमुराद आनंद आम्ही उपभोगला. बर्फाचे गोळे बनवून आम्ही सर्वांनी एकमेकांच्या अंगावर फेकले.

बर्फामध्ये लोळलो. त्यानंतर आम्ही हैदराबादमधील सुप्रसिद्ध मीना बाजार मध्ये खरेदीसाठी गेलो. मी माझ्यासाठी आणि माझ्या ताईसाठी खड्यांचा हार आणि बांगड्या खरेदी केल्या. तसेच आईसाठी खड्यांचे कानातले खरेदी केले. त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवर गेलो आणि सर्व तयारी करून निघालो. कारण आमची पुण्याला येण्याची रेल्वे संध्याकाळी ७ वाजता होती.

तीन दिवसांनी आम्ही आमचा अविस्मरणीय, अपूर्व प्रवास संपवून विचारांच्या कोषागारात नवीन ठिकाणाची माहिती घेऊन परतलो. आम्ही ही आमची हैद्राबाद सहल आणि आमच्या त्यासोबत असणाऱ्या आठवणी कधीच विसरू शकत नाही.  


तर अशा प्रकारे आम्ही ह्या लेखामध्ये मी केलेली सहल, आमची सहल या विषयावर निबंध, भाषण दिले आहे. जर तुम्हाला हा निबंध भाषण आवडले असेल तर कृपया खाली ५ स्टार रेटिंग द्या आणि कंमेंट्स मध्ये तुमचं मत कळवा. धन्यवाद.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 31 Average: 3.3]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

1 Comment

Secured By miniOrange