निबंध भाषण

महापरिनिर्वाण दिन दिवस माहिती, निबंध, भाषण मराठी मध्ये (Mahaparinirvan Din / Diwas)

महापरिनिर्वाण दिन दिवस माहिती, निबंध, भाषण मराठी
marathistars.com

यावर्षी महापरिनिर्वाण दिन हा शुक्रवार, ६ डिसेंबर २०१९ ला साजरा केला जाईल. या दिवशी चैत्यभूमी इथे विशेष व्यवस्था केली जाते. चैत्यभूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे ठिकाण, इथेच बाबासाहेबांचे अंतिम संस्कार झाले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून भारतभरातून लाखो लोक बाबासाहेबांच्या दर्शनासाठी चैत्यभूमी ला भेट देतात. हे स्थान मुंबईमधील दादर याठिकाणी, समुद्रकिनारी आहे.

आम्हाला असे वाटते कि या वर्षी देखील लाखोच्या संख्येने लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये येतील. तसेच आम्हाला असा अंदाज आहे की, भारतातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा जसेकी निबंध, भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातील. आपण कदाचित अशाच एका निबंध किंवा भाषण स्पर्धेत भाग घेतला आहात म्हणूनच आपण या ब्लॉग वरती आहात. आम्ही आपणास येथे महापरिनिर्वाण दिन / दिवस विषयी एक नमुना भाषण, निबंध आणि काही माहिती दिली आहे. आपण हि माहिती वाचून एकंदर संदर्भ घेऊ शकता आणि आणि त्याच्यावरून आपलं स्वतःचं भाषण, निबंध लिहू शकता. या माहितीचा वापर आपणास अँकरिंग स्क्रिप्ट साठी सुद्धा होऊ शकतो.

महापरिनिर्वाण दिन / दिवस निबंध मराठीमध्ये (Essay on Mahaparinirvan Din in Marathi)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ मध्ये हे जग सोडले आणि हाच दिवस महापरिनिर्वाण दिन किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेल्या त्यांच्या आजीवन प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी भारतभरातून लाखो लोक मुंबईमधील चैत्यभूमीला या दिवशी भेट देतात.

भारतीय राज्यघटनेचे जनक, बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर दलितांच्या हक्कासाठी लढले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारतातील दलितांना आरक्षण आणि सामाजिक समानता मिळाली. भारतातीलच नव्हे तर जगभरातील दलित लोक किंवा बुद्ध धर्माचे अनुयायी बाबासाहेबांना एक मसीहा मानतात.

महापरिनिर्वाण म्हणजे काय?

बौद्ध धर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचे प्रमुख लक्ष आणि मूलभूत तत्व देखील आहे. संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण हे “परिणीबाना” असे लिहिले गेले आहे, याचा शब्दशः अर्थ ” मोक्ष” असा होतो. ” कर्म” म्हणजे आपण केलेल्या कृती, बौद्ध धर्मानुसार आपण आपले कर्म आयुष्यभर जमा करत असतो आणि ते आत्म्या मार्गे पुढच्या जन्मात पोहोचते. जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते आणि तिचे शरीर विघटित होते पण तरीही आत्म्याचा प्रवास चालूच राहतो. एखाद्याच्या मृत्यूसमयी जर त्याच्या कर्माचे कर्ज जमा नसेल तर तो आत्मा जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटतो, म्हणजेच त्याला मोक्ष मिळतो; यालाच बौद्ध धर्मात महापरिनिर्वाण असे बोलले गेले आहे.

बौद्ध पवित्र मजकूर महापरिनिर्वाण सुत्तनुसार भगवान बुद्धांचा मृत्यू हा मूळ महापरिनिर्वाण म्हणून ओळखला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ५,००,००० समर्थकांसह बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांच्या अवशेषांवर बौद्ध धर्मानुसार विधी करून मुंबईतील दादर चौपाटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या जागेला आता चैत्यभूमी असे म्हटले जाते. भारतातील बौद्ध समाजाचे लोक आंबेडकरांना एक बौद्ध गुरूच म्हणतात.

बौद्ध धर्माच्या अनुयायांना असे वाटते की बाबासाहेबांनी दलितांसाठी केलेल्या कार्यामुळे ते या जीवनाच्या कर्मापासून मुक्त झाले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर ते जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटले आहेत, म्हणजेच त्यांना मोक्ष मिळाला आहे, म्हणजे त्यांचे महापरिनिर्वाण झाले आहे.

महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी मध्ये (Speech on Mahaparinirvan Din in Marathi)

आज दिनांक ६ डिसेंबर २०१९, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३वा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेब हे असे व्यक्तिमत्त्व होते किंबहूना आहेत की त्यांच्या सम कोणी झाले नाही आणि पुढे होणारही नाही. त्यांनी केलेल्या कार्यामुळे, त्यांच्या बलिदानामुळे ते आपल्यासाठी पूज्यनीय आहेत; ते आजही आपले प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि नाव हे असेच अजरामर राहील.

बाबासाहेबांनी आयुष्याच्या सुरुवातीला खडतर मेहनत केली, खूप अन्याय ही सहन केला. अनेक संकटांना ते सामोरे गेले. त्यांनी आपल्या समाजासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली, कारण त्यांना आपल्या निद्रिस्त समाजाची अस्मिता जागवायची होती.

आजच्या तरुण पिढीला जर विचारले तुमचा आदर्श कोण तर कोणी बॉलीवुड एक्टर चे नाव घेईल तर कोणी कुठल्या क्रिकेटरचे. नवीन पिढीला आंबेडकरांचे जीवनचरित्र माहीतच नाही, तर ते त्यांचे आदर्श कसे बनतील? बाबासाहेबांच्या शिकवणीचा एक टक्का जरी आपण आयुष्यात अनुभवला तर आपले जीवन सुखकर होईल. त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांचे समर्पण यातून शिकण्यासारखे खूप काही आहे, त्याच्यासमोर सेलिब्रेटी किंवा खेळाडू नक्कीच कमी पडतील.

आपण आज इथे बाबासाहेबांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिन निमित्त जमले आहोत.आज आपण एक प्रतिज्ञा घेऊ की बाबासाहेबांच्या नावाने फक्त घोषणा करण्यापेक्षा त्यांचे जीवनचरित्र वाचू , त्यांच्या कार्याचा अभ्यास करू आणि त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न करू. बाबासाहेबांनी आपल्यासाठी त्यांचे आयुष्य खपवले आणि आपण त्यांच्यासाठी एवढे ही करू शकत नाही का?

मी आशा करतो की आजपासून आपण सारे बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू. त्या अजरामर दिव्याने आपल्या आयुष्याचा रस्ता प्रकाशमय करून ठेवला आहे याचा फायदा घेऊयात, पुढे जाऊ यात, प्रगती करूयात; आपल्या समाजाला, आपल्या देशाला महान बनवूया. मला असं वाटते की बाबासाहेबांची इच्छा होती कि त्यांना आपल्याला विकसित झालेले पाहायचे होते; शेकडो वर्षे आपण मागासलेले राहिलो आहोत, आपल्यावर अन्याय झाले आहेत पण बाबासाहेबांनी आपल्याला समान हक्क मिळवून दिले आहेत. आता आपली जबाबदारी आहे की इथून आपण पुढे जाऊन बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

अशा या महान व्यक्तीला मी नमन करून आजचे भाषण संपवतो आणि अशा करतो की त्यांचे आशीर्वाद माझ्यावरती नेहमी राहतील. जय भिम, जय हिंद.


इथे दिलेली माहिती, निबंध, भाषण जर तुम्हाला आवडले असेल तर या पोस्टला चांगली रेटिंग द्या. कमेंट सेक्शनमध्ये आपण आपले मत नोंदवू शकता. धन्यवाद.

Reference: Mahaparinirvan Din

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 2 Average: 3]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange