निबंध भाषण

गुरुपौर्णिमा मराठी माहिती, निबंध (Guru Purnima)

गुरुपौर्णिमा मराठी माहिती, निबंध
hinditeacherssatara

गुरुपौर्णिमा शालेय विद्यार्थ्यांसाठी एक खूप महत्त्वाचा सण आहे. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरूंची/ शिक्षकांची पूजा करतात, त्यांना आदर देतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांच्या सन्मानार्थ शाळांमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व/ भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात. आम्ही या लेखामध्ये तुम्हाला गुरुपौर्णिमे बद्दल एक नमुना निबंध आणि माहिती देणार आहोत. या निबंधाचा आणि माहितीचा उपयोग तुम्हाला भाषण तयार करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो.

गुरुपौर्णिमा निबंध

गुरुपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण किंवा परंपरा आहे जी अध्यात्मिक आणि शैक्षणिक शिक्षकांस समर्पित आहे. गुरु पौर्णिमा हा सण भारत आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध लोक साजरे करतात. हा उत्सव आपल्या आध्यात्मिक गुरू किंवा शिक्षकांचा आदर करणे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. महात्मा गांधीनी त्यांचे अध्यात्मिक गुरू श्रीमद्र रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुपौर्णिमेचे पुनरुज्जीवन केले.

गुरुपौर्णिमा साजरी कशी केली जाते?

गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनुयायी आपल्या गुरूंच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. गुरु हा शब्द “गु” आणि “रु” या दोन शब्दांपासून बनला आहे. “गु” म्हणजे अंधकार किंवा अज्ञान आणि “रु” म्हणजे दूर करणारा. म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करतात त्यांना गुरु असे म्हटले जाते.

गुरु पौर्णिमेचा भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठा वाटा आहे. भारतातील शाळांमध्ये गुरुपौर्णिमा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यादिवशी शिक्षकांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, काही शाळांमध्ये या दिवशी विद्यार्थी शिक्षकांची भूमिका पार पडतात. ते खालील वर्गात जाऊन इतर विद्यार्थ्यांना शिकवतात. ही पद्धत पौराणिक नाही तर आधुनिक आहे, पण या पद्धतीमुळे या विद्यार्थ्यां आणि शिक्षक यांच्यातील दुरावा कमी होतो, एक दिवसासाठी का होईना विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आयुष्य आणि मेहनत कळते. ही पद्धत 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनाच्या दिवशी ही काही शाळांमध्ये अवलंबली जाते.

बौद्ध धर्मामध्ये या दिवशी भगवान बुद्धाची पूजा केली जाते. योगिक परंपरेनुसार या दिवशी भगवान शंकर योगाचे शिक्षण देण्यासाठी सप्तर्शीचे गुरू बनले. हिंदू पद्धतीनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी महान ऋषी व्यास यांची पूजा केली जाते. ऋषी व्यास यांना गुरु-शिष्य परंपरेचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी ऋषी व्यास यांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी त्यांनी ब्रह्म सूत्र लिहिण्यास सुरुवात केली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ऋषी व्यासांच्या सन्मानार्थ ब्रह्म सूत्रांचे पठण केले जाते, गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. हिंदू तपस्वी आणि संन्यासी देखील या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करतात. तसेच भारतातील संगीत आणि नृत्याचे विद्यार्थीही आपल्या गुरूंची या दिवशी पूजा करतात.

योगिक परंपरा आणि गुरुपौर्णिमा

योगिक परंपरेनुसार ज्या दिवशी भगवान शंकर आदिगुरू बनले त्या दिवसाला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. 15000 हजार वर्षांपूर्वी हिमालयाच्या उत्तरी भागात एक योगी अवतरले. हे कुठून आले हे कोणालाच माहिती नव्हते पण त्यांची उपस्थिती अद्भुत होती आणि त्यांना पाहायला खूप लोक जमले. योगींच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागले, हे पाहता लोक हळूहळू दूर होऊ लागले पण सात व्यक्ती तिथे थांबले.

योगींनी डोळे उघडताच सात व्यक्तींनी आपणास त्यांचे शिष्य बनवण्याची विनंती केली पण योगींनी ही विनंती फेटाळली. सरतेशेवटी त्यांनी या सात व्यक्तींना सुरुवातीच्या काही पद्धती सांगितल्या आणि डोळे परत बंद केले. 84 वर्षानंतर दक्षिणायनच्या दिवशी योगींनी डोळे उघडले. 84 वर्षांच्या त्यांच्या साधनेस पाहून योगी खुश झाले आणि त्यांना शिष्य बनवण्यास मान्य झाले. या दिवशीच्या पुढच्या पौर्णिमेस योगी दक्षिणेकडे वळून बसले व या सात व्यक्तींना आपले शिष्य बनवले. या दिवशी भगवान शिव आदियोगी (प्रथम योगी) बनले. बरेच वर्ष आदीयोगींनी सप्तर्षींना शिक्षण दिले, पुढे सप्तर्षीनी या ज्ञानाचा प्रसार जगभरात केला.

योगिक परंपरेमध्ये गुरुपौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे कारण या दिवशी आदीयोगींनी आपले ज्ञान सप्तर्षी द्वारे सर्व जगाला दिले. हे सात ऋषी पुढे जाऊन योगातील सात प्रमुख पद्धतीचे प्रतीक बनले, या पद्धतींचा अजूनही सराव केला जातो.

गुरूपौर्णिमा माहिती

इथे आम्ही तुम्हाला गुरुपौर्णिमा बाबत थोडीशी आणखी माहिती देत आहोत. या माहितीचा वापर आपण निबंध भाषण किंवा लेख लिहिण्यासाठी करू शकता.

गुरु पौर्णिमेच्या बुद्ध धर्मातील महत्व

ज्ञानार्जनाच्या 5 आठवड्यानंतर बुद्ध बोधगया पासून सारनाथ कडे निघाले. बुद्ध बनवण्या अगोदर त्यांनी सांसारिक सुख आणि त्यांच्या पाच मित्रांचाही त्याग केला. त्यांचे ते पाच भिक्षु मित्र सारनाथला जातात. ज्ञानार्जना नंतर बुद्ध आपल्या पाच मित्रांच्या शोधात सारनाथकडे निघतात. पुढे त्यांना बौद्ध धर्माचे शिक्षण देतात आणि ते सुद्धा प्रबुद्ध होतात. बुद्धांनी या पाच भिक्षूंना आपले पहिले प्रवचन दिले यास धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (धर्मचक्रप्रवर्तन सूत्र) म्हटले जाते आणि या दिवशी आषाढ महिन्याची पोर्णिमा होती. म्हणून गुरु पौर्णिमेचे बौद्ध धर्मातही खूप महत्त्व आहे.

नेपाळ

नेपाळच्या शाळांसाठी त्रिनोक गुहा पौर्णिमा हा एक खूप मोठा दिवस आहे. हा दिवस म्हणजेच नेपाळमधील शिक्षक दिन होय. या दिवशी विद्यार्थी शिक्षकांना मिठाई, हार, स्थानीय कापडाने बनवलेली विशेष टोपी भेटवस्तू म्हणून देतात. शिक्षकांचे आभार मानण्यासाठी विद्यार्थी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच्य या कार्यक्रमाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते आणखी सुदृढ बनते.


आम्ही आशा करतो की इथे दिलेली माहिती किंवा निबंध तुम्हाला उपयोगी पडेल. जर असे असेल तर तुम्ही या लेखाला चांगली रेटिंग देऊ शकता आणि गुरुपौर्णिमे विषयीचे आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. धन्यवाद.

Reference: Guru Purnima

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 0 Average: 0]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange