मराठी

गौरी गणपती माहिती मराठीमध्ये

गौरी गणपती माहिती मराठीमध्ये

‘प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया’

अशा भक्तिमय आणि सुंदर ओळी म्हणूनच आपण कोणत्याही कार्यक्रमाची किंवा शुभकार्याची सुरुवात करतो. त्याचप्रमाणे शाळेमध्ये सुद्धा प्रथम गणपतीची प्रार्थना घेतली जाते. तसेच कोणतेही चांगले काम करताना आपण न विसरता गणपती बाप्पांचे स्मरण करतो. आपल्या सर्वांचाच हा लाडका बाप्पा वर्षातून एकदा गौरींसह आपल्या सर्वांच्या भेटीस, आपल्या घरी राहावयास येतो. कोणाकडे दिड दिवस, तर कोणाकडे ५, ७ आणि  १० दिवसांसाठी हे बाप्पा असतात. लहान मुलांच्या आवडीचा हा बाप्पा कधी घरी येतो असे त्यांना वाटते. लहानमुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वच जण बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतात. गौरी गणपतीच्या शोभेच्या वस्तू, दागदागिने आणि कलरच्या लाईट्सने बाजारपेठा सजलेल्या असतात. त्यामुळे शहरातील बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी लोकं गर्दी करतात. घरातील सर्व माणसे गणपतीबाप्पांच्या आगमनाआधी खूपच उत्साहात डेकोरेशनच्या तयारीमध्ये गुंतलेले असतात.

हरितालिका तृतीया

या आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाच्या आदल्या दिवशी हरितालिका तृतीया असते. यादिवशी बहुतांश सर्व स्त्रिया उपवास करतात. हरितालिकांची पूजा करतात. पूजेसाठी पाटावर हरितालिका ठेवून त्यांच्यासमोर वाळूची पिंड तयार करतात. त्या पिंडीवर पंचामृत वाहतात. पूजेसाठी हरितालिकांच्याजवळ पत्री(पाच फळझाडांची पाने) ठेवतात. ५ फळे नैवेद्य म्हणून ठेवतात. दूध साखरेचाही नैवेद्य दाखवतात. त्यानंतर तुपाचा दिवा, अगरबत्ती लावून पूजेची कहाणी वाचतात. यावर्षी येणारी ही हरतालिका तृतीया १२ सप्टेंबर २०१८ रोजी आहे.

गणेश चतुर्थी

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. यावर्षी येणारी ही गणेश चतुर्थी १३ सप्टेंबर २०१८ रोजी आहे. गणपती बाप्पांचे आगमन होण्याआधीच सर्व लहान मुलांची किलबिल चालू असते. कारण बाप्पांना आणण्यासाठी त्यांना जायचे असते. सर्वचजण ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करत बाप्पांना आपल्या घरी आणतात. त्यानंतर गणपतीबाप्पाची विधिवत पूजा केली जाते. सर्वांच्याच घरामध्ये यादिवशी लाडक्या बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून बनवले जातात. बाप्पांसाठी दुर्वांचा हार तयार केला जातो. त्यांचे आवडते जास्वंदाचे फुल आवर्जून वाहिले जाते. काही जण तर जास्वंदाच्या फुलांचा हार बनवून बाप्पांना घालतात. त्यानंतर गणपती बाप्पांना जाणवे, फेटा घातला जातो. त्यांच्या आवडीचे कमळाचे फुल हातात ठेवले जाते. सर्व विधिवत पूजा झाल्यावर बाप्पांना सर्वजण मनोभावे नमस्कार करतात, आरती करतात. चाळीमध्ये किंवा सोसायटीमध्ये सर्वजण एकमेकांच्या घरी जाऊन एकत्र आरती करतात.

ऋषिपंचमी

गणपती बाप्पांच्या आगमनानंतरदुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी असते. यादिवशी स्त्रिया उपवास करतात. हा उपवास खूप कडक केला जातो. बैलाने नांगरलेल्या किंवा बैलाच्या मदतीने लावलेल्या भाज्या काही खायच्या नाही. हाताने लावलेलं बी किंवा रोप यापासून आलेली भाजी खाली जाते. अळूची पाने, देठ, चिचारड , कारलं अशा भाज्या नुसत्या शिजवून तेल न टाकता केल्या जातात. अंघोळ करताना आघाडा दुर्वा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ केली जाते. ऋषींची पूजा केली जाते. अंघोळ करूनच हा उपवास सोडावा लागतो. यावर्षी येणारी ऋषिपंचमी १४ सप्टेंबर २०१८ रोजी आहे.

गौरी आगमन

ऋषिपंचमीच्या दुसऱ्या दिवशी गौरींचे(महालक्ष्मींचे) आगमन होते. यावर्षी हे गौरी आवाहन १५ सप्टेंबर २०१८ रोजी आहे. गौरी पूजन १६ सप्टेंबर रोजी आहे तर गौरी विसर्जन १७ सप्टेंबर रोजी आहे.

गौरी आवाहनाच्या दिवशी सोन्याच्या पावलांनी गौरींचे आगमन सर्वांच्या घरी होते. यादिवशी गौरींची स्थापना केली जाते. त्यानंतर गौरायांना सोन्या चांदीच्या दागिन्यांनी नटवले जाते. पूजा केल्यानंतर काठापदराच्या साड्या नेसलेल्या या गौराया खूपच प्रसन्न दिसतात. गौरी आगमनानंतर घरामध्ये खूपच प्रसन्न असे वातावरण निर्माण होते.

दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाच्या दिवशी गौरी गणपतीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. त्याचबरोबर स्त्रिया घरी फराळ बनवून तो सुद्धा गौरींना नैवेद्य म्हणून दाखवितात. सजावटीसाठी गौरींसमोर शोभेच्या वस्तू ठेवतात, रांगोळी काढतात. मनोभावे नमस्कार करून दररोज गौरी गणपतीची आरती केली जाते. काही ठिकाणी या गौरी गणपतींसाठी खूप छान असे फुलांचे डेकोरेशन, तर काही ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिस चे डेकोरेशन केले जाते. काही लोक घरी थर्माकॉलचे मखर तयार करतात.

महाराष्ट्रामध्ये तर बहुतांश बऱ्याच ठिकाणी गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येतात. विजेत्या स्पर्धकांना योग्य ते बक्षिसे दिले जाते. घरोघरी सुंदर अशी गौरायांची आरास केली जाते. स्त्रिया गौरीपूजनाच्या दिवशी एकमेकींना हळदी कुंकवास बोलावतात.

या सण सोहळ्यांच्या निमित्ताने सर्व माणसे एकमेकांना भेटतात. त्यामुळे एकमेकांमधील आपुलकी वाढते, प्रेम वाढते. आपल्या भारतामध्ये सर्व सण उत्सव उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. भारताप्रमाणेच परदेशातही आपले सर्व मराठी बांधव एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात. एकत्र येऊन लाडक्या गणपती बाप्पांचा हा सण साजरा करतात. गणपती बाप्पांसाठी गणेश चतुर्थी अगोदरच सर्वजण मिळून जय्यद तयारी करतात. दररोज सर्वजण उत्साहात गणपती बाप्पांची पूजा, आरती करतात. एकत्र येऊन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. यावरून असे दिसून येते की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांना किती महत्व आहे आणि हे सर्व सण भारतीय मनापासून साजरे करतात.

मुंबई आणि पुण्यामधील गणपती पाहण्यासाठी बऱ्याच ठिकाणांहून इतर शहरांमधून, गावाकडून लोक येतात. त्यामुळे गणपती पाहण्यासाठी खूप गर्दी दिसते. मोठमोठे भव्य दिव्य असे गणपती तसेच सगळीकडेच आकर्षक असे डेकोरेशन पाहायला मिळते. काही ठिकाणी हालते देखावे, लाईट्सचे डेकोरेशन, जिवंत देखावे, फुलांचे डेकोरेशन पाहायला मिळते. काही ठिकाणी ऐतिहासिक प्रतिकृती तयार केल्या जातात. सगळीकडेच गणपतीचे १० दिवस प्रसन्न असे वातावरण असते. १० दिवस गणपती बाप्पांची गाणी, सगळीकडेच स्पिकर्सचा आवाज खूपच गोंधळ, गोंगाट असतो. त्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पांचे विसर्जन. खुपच आनंदात घालवलेले १० दिवस आठवतात. आता आपले लाडके बाप्पा त्यांच्या गावाला जाणार या विचाराने सर्वजण नाराज होतात. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत सर्वजण बाप्पांना निरोप देतात.

सूचना:  जर इथे दिलेली माहिती तुम्हाला आवडलीअसेल तर या पोस्ट ला चांगली रेटिंग द्या. तुमचे मत कंमेंट सेक्शन मध्ये नोंदवू शकता. आम्हाला तुमचे अभिप्राय ऐकायला आवडते, आम्हाला त्यांनी प्रोत्साहन मिळते. धन्यवाद.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 19 Average: 3.4]

Didn't find what you were looking for?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

4 Comments

About the author

Gayatri Pokale