निबंध भाषण मराठी

सर्कशीतील हत्तीचे मनोगत, आत्मवृत्त मराठी निबंध, माहिती, भाषण, लेख

सर्कशीतील हत्तीचे मनोगत, आत्मवृत्त मराठी निबंध

शालेय विद्यार्थ्यांना खूप वेळा वेगवेगळ्या विषयांवर भाषण, निबंध लिहून आणण्यास सांगितले जाते. हे निबंध विविध प्रकारचे असतात आणि अशाच विविध निबंध प्रकारांपैकी एक म्हणजे आत्मवृत्तपर निबंध. सर्कशीतील हत्तीचे मनोगत, आत्मवृत्त निबंध हा अशाच निबंधांपैकी एक.

ह्या पोस्ट मध्ये आम्ही सर्कशीतील हत्तीचे मनोगत, आत्मवृत्त निबंध, भाषण, लेख मराठी मध्ये दिला आहे. हा मराठी निबंध तुम्हाला तुमच्या गृहपाठ तसेच परीक्षेमध्ये सर्कशीतील हत्तीचे मनोगत, आत्मवृत्त निबंध लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

सर्कशीतील हत्तीचे मनोगत, आत्मवृत्त मराठी निबंध, माहिती, भाषण, लेख

ऐका मित्रांनो, मी सर्कसमधला एक वृद्ध हत्ती बोलतोय. या म्हातारपणाच्या काळात माझ्यापुढे हा केवढा बिकट प्रश्न उभा राहिला आहे, मी आता कुठे जाऊ? ना घर का ना घाट का, अशी माझी अवस्था झाली आहे.” असं का झालं तुम्हाला ठाऊक आहे? नाही ना? थांबा तर तुम्हाला मी माझी सर्व कहाणी आता सांगतो.

एका दाट अशा अभयारण्यात माझा जन्म झाला. अतिशय निसर्गसंपन्न असे ते अरण्य होते. हिरव्यागार रानात खेळताना किती मज्जा येत होती. लहानपणी काही काळ आई वडिलांसोबत राहिल्यावर मी माझ्या वयाच्या काही मित्रांसोबत रमू लागलो. त्या वेळी पाण्यात डुंबणे हा माझा सर्वात आवडता खेळ होता. अरण्यात खाण्यापिण्याची चंगळ होती.  ( नदीचे आत्मवृत्त, नदीची आत्मकथा, मी नदी बोलतेय.. )

मस्त पाण्यात डुंबायचे, रानातली आवडणारी झाडांची पाने व वेली मनसोक्त खायची आणि मग निळ्याशार आकाशाखाली गाढ झोपायचे. रात्रीच्या वेळी झोप अली नाही तर आकाशातील चंद्र व चांदण्या यांचा लपंडाव पाहत राहायचे. असे होते ते मस्त जीवन. पण माझ्या वाट्याला फारच थोडे दिवस ते सुख आले. कारण एके दिवशी मी माणसाच्या तावडीत सापडलो. त्यालाही कारण माझा डुंबण्याचा छंदच होता.

आजही मला तो दिवस आठवतो. आम्ही सर्व दोस्तमंडळी पाण्यात डुंबत होतो. काही वेळानंतर माझ्याबरोबरचे मित्र पाण्याबाहेर गेले; पण माझी हौस फिटली नव्हती. मी एकटाच पोहत पोहत दूर गेलो. माझ्या लक्षातही आले नाही की मी अभयारण्यापासून खूप दूर आलो आहे. पोहताना एका ठिकाणी माझे पाय अडकले, मला वाटले शेवाळे असेल. पण तसे काही नव्हते.

माझे पाय सुटेना कारण ते शेवाळे नव्हते, तर जाळे होते. थोड्याच वेळात काही लोक आले. त्यांनी मला भल्या मोठ्या दोरखंडाच्या साहाय्याने जखडले आणि मला गाडीमध्ये शहराच्या दिशेने नेले.

त्या क्षणापासून माझं गुलामगिरीची जीवन सुरु झाले. माझ्या करणीने माझे स्वातंत्र्य हरपले होते. एका सर्कशीत माझी भरती केली. भलीमोठी सर्कस होती ती. अनेक प्राणी आणि कसरतपटू होते त्या सर्कसमध्ये. सकाळपासून सर्कस चाले. सर्वात लहान म्हणून माझे खूप कौतुक होत असे. मला सांभाळणारा माहूतही ‘बच्चा बच्चा’ म्हणून माझे खूप प्रेमाने लाड करत त्यावेळी मला काही काम नसे आणि अजून माझ्या पायात साखळदंडही पडला नव्हता. म्हणून मीही त्या जगण्यात रमून गेलो होतो. ( एका झाडाचे मनोगत, आत्मवृत्त, आत्मकथा मराठी निबंध )

जसजसा मी मोठा होऊ लागलो तसतसा माझा अभ्यासक्रम सुरु झाला. माझ्यातील हुडपणा कमी होत नव्हता. मग अनेकदा चाबकाचे फटके बसू लागले. अंकुशाची टोचणी सहन करावी लागली. शेवटी मला कळून चुकले की, आता आपण इथले गुलाम आहोत. हुडपणा करून काही उपयोग नाही. मग मी खेळाचे सर्व प्रकार झटपट शिकून घेतले. रिंगमास्टरचा प्रत्येक शब्द मी ऐकू लागलो. त्याच्या हुकुमानुसार मी वागू लागलो.

आजही मला सर्कसमधल्या तंबूतला माझा पहिला दिवस आठवतो. त्या दिवशी मला खास सजवण्यात आले होते. अंगावर मखमली झूल व चमकणारे चांदीचे दागिने घालण्यात आले होते. माझा मास्तर मला ‘इंद्रा’ म्हणून हाक मारत असे. मोठ्या प्रेमाने त्याने स्वतः मला रिंगणात नेले आणि आज्ञेनुसार मी एकापाठोपाठ एक खेळ केले. मास्तर एवढा खुश झाला की परत आल्यावर त्याने मला पुडाभर पेढे चारले.

अशी कित्येक वर्षे मी सर्कसमध्ये काढली. माझ्या सर्व खेळांतील ‘गणेशपूजेचा’ खेळ सर्वांना विशेष आवडे. प्रेक्षक खूप टाळ्या वाजवत; मग मीपण देहभान विसरून काम करी. आता अरण्यातील स्वातंत्र्याचा विसर पडला होता. मी म्हातारा झालो होतो. त्यातच भर म्हणजे मूक प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या संस्थेने सर्कसमधील प्राण्यांच्या खेळांवर भूतदयेपोटी आक्षेप घेतला. म्हणून मला मुक्त करण्यात आले.

खरंच सर्कस पाहणाऱ्या तुम्हा सर्वांना आम्ही सर्वजण मिळून खूप आनंद देत असतो. पण त्यासाठी आम्हाला खूप कष्ट करावे लागतात, चाबकाचे फटके सहन करावे लागतात. माझ्या सोबतच माझ्या सर्व प्राणिमित्रांचे खूप हाल या सर्कसमध्ये होतात. पण काय करणार?

गुलामगिरी सहन करून आम्हाला जीवन जगावे लागत आहे. त्यासाठी तुम्ही सर्वानी मिळून खरंच काहीतरी केले पाहिजे. मात्र, आता इतक्या वर्षांनी मी आता अरण्यातही जाऊ शकत नाही. म्हणून या शिवालयाबाहेर कसेतरी दिवस काढत आहे. पूर्वीचा रुबाब नाही की पूर्वीची चैन नाही. आणि तो लहानपणीचा खेळण्याचा, पोहण्याचा, बागडण्याचा आनंद तर कुठेतरी हरवूनच गेला आहे.

वरील सर्कशीतील हत्तीचे मनोगत, आत्मवृत्त मराठी निबंध, माहिती, भाषण, लेख जर तुम्हाला आवडले असेल तर चांगली रेटिंग देऊन आम्हाला प्रोत्साहित करा म्हणजे आणखी नवनवीन माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकू.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 4 Average: 4.8]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange