निबंध भाषण

बैल पोळा विषयी माहिती, सजावट, कविता, निबंध (Bail Pola) – बेंदूर

बैल पोळा विषयी माहिती Marathi

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बैल पोळा किंवा बेंदूर या विषयावर काही माहिती किंवा निबंध देणार आहोत. शाळेमध्ये कधी कधी या विषयावरती निबंध लिहिण्याचा गृहपाठ देतात अशावेळी ही माहिती तुम्हाला मदत करू शकेल. हा लेख म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृती ची माहिती पसरवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.

बैल पोळा विषयी माहिती / निबंध

पोळा किंवा बैल पोळा हा बैलाच्या सन्मानाचा उत्सव आहे जो प्रामुख्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात मधील शेतकरी साजरा करतात. तेलंगणाच्या उत्तरेकडील भागातील लोक बैल पोळा सणाला “पुलाला अमावस्या” म्हणतात. या सणाला काही ठिकाणी बेंदूर सुद्धा म्हटले जाते. हा उत्सव मध्य आणि पूर्व महाराष्ट्रातील मराठी लोकांमध्ये मुख्यतः साजरा केला जातो. असेच उत्सव भारतातील इतर ठिकाणी सुद्धा साजरे केले जातात, दक्षिणेस यास “मट्टू पोंगल” आणि उत्तर व पश्चिम भारतात “गोधन” म्हणतात. बैल पोळा सण श्रावण महिन्यात (सामान्यत: ऑगस्टमध्ये) पिठोरी अमावस्येच्या दिवशी असतो. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची सजावट करतात आणि त्यांची पूजा करतात.

बैल पोळा का साजरा केला जातो?

बैल शेतीच्या कामात खूप राबतात, बैल म्हणजे शेतकऱ्याचा मित्रच. आजकाल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतात पण पुरातन काळापासून शेतीची अवजड कामे जसे कि नांगरणी, वाहतूक बैलांच्या साह्यायानेच केली जात असे. पूर्वीच्या काळी मोटरगाड्या नव्हत्या तेव्हा दूरच्या गावी, तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडीचा वापर होत असे. अगदी नव्या लग्न झालेल्या जोडप्याची वरात सुद्धा बैलगाडीतून जात असे. या काळात बैल हा शेतकऱ्याच्या आयुष्याशी खूप जोडून होता. बैलांच्या या मदतीसाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी बैल पोळा सण साजरा केला जातो.

पोळ्याच्या दिवशी बैलांची सजावट कशी केली जाते?

पावसाळ्यातील पेरणी संपल्यानंतर, ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरूवातीस बैल पोळा साजरा केला जातो. या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घातली जाते, नंतर त्यांना विविध वस्तुंनी सजवले जाते. जसे कि गळ्यात एक सुंदर घंटा, पायात घुंगरू, शिंगाना रंगबिरंगी फुले किंवा माळा. बैलांची शिंगे सुद्धा रंगवली जातात. प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांना सगळ्यात सुंदर सजवण्याचा प्रयत्न करतो. आजकाल बैलांच्या साजवटीच्या स्पर्धा सुद्धा असतात, या स्पर्धेत मोठी बक्षीशे सुद्धा असतात म्हणून शेतकरी बैल सजावटी मध्ये खूप परिश्रम घेतात. बैलाच्या पाठीवर सुंदर शाल टाकली जाते, शक्यतो ती लाल किंवा गुलाबी रंगाची असते. काही जण आपली सर्जनशीलता वापरून बैलाच्या अंगावर विविध आकाराचे आणि रंगाचे ठिपके सुद्धा काढतात.

सजावट पूर्ण झाल्यावर गावातील सगळे शेतकरी आपल्या बैलांना घेऊन एका सार्वजनिक ठिकाणी जसे की गावच्या मंदिराजवळ जमा होतात. तिथे बैलांची पूजा केली जाते, त्यांच्या पाया पडले जाते आणि त्यांना पोळ्यासाठी बनवलेल्या विशिष्ट नेवैद्य दिला जातो. या विधि घरीसुद्धा केल्या जातात.

बैलपोळा कविता आणि शुभेच्छा

शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली, ऐनेदार
राजा परधान्या, रतन दिवाण, वजीर पठाण, तुस्त मस्त
वाजंत्री वाजती, लेझिम खेळती, मिरवीत नेती, बैलाला गे
डुल-डुलतात, कुणाची वशींडे, काही बांड खोंडे, अवखळ
कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे, पिवळे तांबडे, शोभिवंत
वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा, सण बैल पोळा, ऐसा चाले
जरी मिरवीती, परि धन्या हाती, वेसणी असती, घट्ट पट्टा
झुलीच्या खालती, कायनसतील आसूडांचे वळ, उठलेले
आणि फुटतील, उद्याही कडाड, ऐसेच आसूड, पाठीवर
सण एक दिन, बाकी वर्षभर, ओझे मर मर,ओढायाचे

माझे मत

पारंपारिक दृष्टीने बैल पोळा हा सण बैलांनी शेतीमध्ये केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. पण आजकाल बैलांच्या सजावटीसाठी होणाऱ्या स्पर्धा, त्यातील बक्षिसे आणि बक्षिसासाठी शेतकऱ्यांनी बैलावर केलेले प्रयोग, हे सारे पाहून असे वाटते की माणसाने हा सण देखील आपल्या फायद्यासाठीच बदलून घेतला आहे. तसेच आजकाल शेतीसाठी नवनवीन उपकरणे उपलब्ध झालेली आहेत त्यामुळे शेतीमध्ये बैलाचा वापर फक्त गरीब शेतकरी करतात ते पण पर्याय नसल्यामुळे. वाढत्या तांत्रिक उपकरणांमुळे हळूहळू शेतीच्या कामांमध्ये बैलांचा वापर कमी होऊ शकतो आणि बैलपोळ्याची ही परंपरा फक्त नावापुरती राहू शकते.

मला वाटते की बैल पोळ्या सारखे सण जरी मेनस्ट्रीम नसतील तरी ते आपण जपले पाहिजेत. ही आपली संस्कृती आहे, या छोट्या छोट्या गोष्टी तर आपली संस्कृती जपून ठेवतात. मग ते बैलपोळा असो, गुढी उभारणे असो किंवा दसऱ्यात सोने वाटणे असो; या साऱ्या गोष्टींमध्ये आपलेपण आहे, या सार्‍या गोष्टी, हे सण आपल्याला मातीशी जोडून ठेवतात. वेळेनुसार आपण प्रगती करणार आहोतच; इंटरनेट, मोबाईल, बिटकॉइन, AI, AR सारख्या गोष्टी आपण वापरणारच आहोतच पण या सगळ्या सोबत आपण आपले मूळ सुद्धा सांभाळून ठेवले पाहिजे. हे माझे खाजगी मत आहे.

Note: जर हा लेख, निबंध तुम्हाला आवडला असेल तर आर्टिकल ला चांगली रेटिंग द्या. बैलाचे आजकालच्या शेतकऱ्यांसाठी चे महत्व काय आहे या विषयावर आपण आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता.

Reference: Pola

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 0 Average: 0]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange